मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असतानाच चोरट्यांनी याच गर्दीचा फायदा घेत फटाक्यांच्या दुकानावर डल्ला मारला. मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली परिसरातील फटाक्यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने तब्बल ६० हजार रुपये किमतीचे फटाके चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संताजीनगर येथील रहिवासी लक्ष्मण रमेश सापधरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी, भुसावळ यांच्याकडून रीतसर परवाना घेऊन बोदवड चौफुली लगत फटाके विक्रीचे दुकान सुरू केले होते. रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे दुकानमालक लक्ष्मण सापधरे हे फटाके विक्रीत व्यस्त होते.

दरम्यान, दुकानातील कामगार आणि नातेवाईक पूजेसाठी बाहेर गेल्याने सापधरे हे दुकानात एकटेच होते. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतल्याचा संशय आहे. रात्री सुमारे ११ वाजता एका ग्राहकाने हँड शॉट फटाक्याची मागणी केली. त्यावेळी रॅकवर तपासणी केली असता संबंधित फटाके जागेवर आढळून आले नाहीत. नंतर सापधरे यांनी संपूर्ण दुकानाची पाहणी केली असता दुकानाच्या मागील बाजूची खिडकी आतून उघडल्याचे निदर्शनास आले. या खिडकीतून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने दुकानातील फटाके चोरून नेल्याचे उघड झाले. चोरी झालेल्या फटाक्यांची एकूण किंमत ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ४५ हजार ६०० रुपये किमतीचे प्रत्येकी १ हजार ९०० रुपये दराचे २४ हँड शॉट फटाके, तसेच १४ हजार ४०० रुपये किमतीचे स्टँडर्ड कंपनीचे १५ स्काय शॉट फटाके यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ३९ नग फटाके चोरट्याने लंपास केले आहेत. या घटनेप्रकरणी दुकानमालक लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश आनंदा मेढे करीत आहेत.