Home धर्म-समाज १०८ वर्षांची अनोखी परंपरा! येवतीत शुक्रवारी रंगणार करदोडा दिवाळीचा उत्सव ; माहेरवाशिणींची गावाकडे धाव

१०८ वर्षांची अनोखी परंपरा! येवतीत शुक्रवारी रंगणार करदोडा दिवाळीचा उत्सव ; माहेरवाशिणींची गावाकडे धाव

0
१०८ वर्षांची अनोखी परंपरा! येवतीत शुक्रवारी रंगणार करदोडा दिवाळीचा उत्सव ; माहेरवाशिणींची गावाकडे धाव

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा होत असताना बोदवड तालुक्यातील येवती गावात मात्र एका अनोख्या परंपरेनुसार दिवाळीचा उत्सव भाऊबीजेनंतर साजरा केला जातो. अंबऋषी महाराजांच्या श्रद्धा आणि भक्तीशी जोडलेली तब्बल १०८ वर्षांची अखंड परंपरा असलेला ऐतिहासिक करदोडा दिवाळी उत्सव येत्या शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी गावात जय्यत तयारी सुरू असून, माहेरवाशिणींसह बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थ गावात दाखल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येवती येथील नामदेव बळीराम माळी यांच्या शेतातील अंबऋषी महाराजांच्या मंदिरात उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता माळी वाड्यापासून अंबऋषी महाराजांच्या मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत महिला, पुरुष आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघणाऱ्या या मिरवणुकीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर अंबऋषी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला करदोडा बांधण्याचा धार्मिक विधी पार पडेल. सामूहिक आरती आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर मंदिर परिसरासह संपूर्ण गावात दिव्यांची रोषणाई करण्यात येणार असून, फटाक्यांच्या आतषबाजीत करदोडा दिवाळी साजरी केली जाणार आहे.

दीडशे वर्षांपूर्वीच्या आख्यायिकेशी जोडली श्रद्धा

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सांगण्यानुसार, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी येवती परिसरात त्वचेच्या एका असाध्य आजाराने थैमान घातले होते. या आजारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यावेळी गावालगतच्या एका झोपडीत अंबऋषी महाराज वास्तव्यास होते. महाराजांच्या आशीर्वादामुळे ग्रामस्थांना या आजारातून मुक्ती मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या अनुभवानंतर ग्रामस्थांची महाराजांवरील श्रद्धा अधिक दृढ झाली आणि तेव्हापासून महाराजांची नियमित सेवा व पूजा करण्याची परंपरा सुरू झाली.

मात्र, दिवाळीच्या दिवशीच अंबऋषी महाराजांचे निधन झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ येवती आणि रेवती येथील ग्रामस्थ दिवाळीच्या मुख्य दिवशी उत्सव साजरा करत नाहीत. भाऊबीजेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी किंवा शुक्रवारी करदोडा दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. गेल्या १०८ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात असून, आजही ग्रामस्थ तितक्याच श्रद्धेने हा उत्सव साजरा करतात.

माहेरवाशिणींच्या आगमनाने गावात उत्साह

करदोडा दिवाळी उत्सव म्हणजे येवतीकरांसाठी केवळ धार्मिक सोहळा नसून गावातील नातेसंबंध आणि एकत्रितपणाचा आनंद साजरा करण्याचा विशेष दिवस आहे. नोकरी, व्यवसाय आणि अन्य कारणांमुळे बाहेरगावी स्थायिक झालेले ग्रामस्थ या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात. विशेषतः माहेरवाशिणींच्या आगमनाने गावातील उत्साह द्विगुणित होतो. वर्षभरानंतर नातेवाईक, आप्तस्वकीय आणि गावकऱ्यांच्या भेटीगाठी होत असल्याने उत्सवाला कौटुंबिक जिव्हाळ्याची किनार लाभते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीनेही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आले असून, परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. भाविकांना उत्सवात सहभागी होताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ग्रामस्थांकडूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत.