जळगाव प्रतिनिधी । जुना खेडी रोड परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त अभियंत्याची ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना ६ एप्रिल रोजी उघडकीला आली. शोधाशोध करून दुचाकी मिळून न आल्याने ९ एप्रिल रोजी सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, गोपाळ सिताराम पाटील (वय-६२) रा. जुना खेडी रोड प्रेमचंद रोड कुटुंबियांसह राहतात. हे दिपनगर येथील औष्णिक विद्यूत केंद्रातील सेवानिवृत्त अभियंता आहेत. घरघुती कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएम २७६७) क्रमांकाची मोपेड दुचाकी आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकी पार्कींग करून लावली होता. दुसऱ्या दिवशी ६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोध घेवूनही दुचाकी मिळून आली नसल्याने त्यांनी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील करीत आहे.