जळगाव प्रतिनिधी । जीवनमोती कॉलनीत राहणाऱ्या वृंदा गरुड या शिक्षीकेच्या घरातून १० साड्या चोरीस गेल्या होत्या. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून साड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
भोलासिंग जगदशीसिंग बावरी (वय २८, रा. शिरसोली नाका) असे अटक केल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, वृंदा गरुड ह्या ४ मे ते ३ जून पर्यंत बाहेरगावी गेलेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचे बंद घर फोडून बावरी व त्याच्या एका अल्पवयीन साथीदारोन गरुड यांच्या घरातून २५ हजार ३०० रुपये किमतीच्या दहा साड्या चोरल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बावरी याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या साड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सन २०१२ पासून नऊ वर्षात बावरी याच्यावर एकुण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हिस्ट्रीशिटर्सच्या यादीत तो अग्रस्थानावर आहे. बावरी याला हद्दपारही करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.