जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | निवृत्ती नगर भागातील संकल्पसिद्धी अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक अनिल लक्ष्मण सपकाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली असून, त्याच्याकडून रोख रक्कम व मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी अनिल सपकाळे आपल्या आईला भेटण्यासाठी गेले असताना त्यांच्या अपार्टमेंटमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या चोरीबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा तपास सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्हा सचिन भागवत सपकाळ (रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) याने आपल्या साथीदारांसह केला आहे. माहितीच्या आधारे पोलीसांनी सचिन सपकाळ याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या इतर तीन साथीदारांसह दोन मोटारसायकलचा वापर करून संकल्पसिद्धी अपार्टमेंटमधील बंद घर फोडल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सचिन सपकाळकडून चोरीसाठी वापरलेली बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसायकल (MH 19 EL 3761), रोख ५० हजार रुपये, तसेच १ ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सचिन सपकाळ (वय ३३, रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.