बोरगाव येथे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोरगाव येथे राहता घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरातील रोकडसह दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरून नेल्याचे घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी भावलाल धोंडू मराठे (वय ५०) हे शेती काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घराला कुलूप लावून ते शेतात कामाच्यानिमित्ताने निघून गेले. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या राहत्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरातील लोखंडाच्या कपाटातून सुमारे  १ लाख रुपयांची रोकड आणि ८० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याची पोत, सोन्याचे टोंगल आणि कानातील कर्णफुले असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भावलाल मराठे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल गुंजाळ करीत आहे.

 

 

Protected Content