बंद घर फोडून ६८ हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । द्रौपदी नगरातील बंद घर फोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण ६८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील दौप्रदी नगरातील भगवान भोमा पाटील हे एका खासगी कंपनीत मार्केटींग मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते मुळचे पारोळा येथील रहिवाशी असून ते पत्नी जयश्री व मुलगा अंश अशांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे सासरे कृष्णा पाटील हे शहरातील अयोध्या नगरात राहतात. भगवान पाटील यांच्या सासूचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे बुधवारी २० एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून ते पत्नी व मुलाला घेऊन अयोध्यानगरात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. तर घरातील तसेच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी घरातील कपाटातील साहित्याची पाहणी केली असता. कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लांबविल्याचे त्यांना दिसले.

चोरी झाल्याची खात्री झाल्यावर पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक गणेश देशमुख, योगेश साबळे, समाधान पाटील, सलीम तडवी व विकास पहूरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  त्यांनतर भगवान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content