सावद्यात ‘या’ महिला लोकनियुक्त नगराध्यक्षापदाच्या प्रबळ दावेदार !


सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी । येथील नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण निघाले असून यंदा या प्रवर्गातून नवीन चेहरा नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. तर, मातब्बरांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली असून काही प्रबळ दावेदारांची नावे समोर आली आहेत.

शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावदा नगरपालिकेत महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले असून, या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात महिलांचा मान, सहभाग आणि प्रभाव आणखी वाढणार आहे.

यापूर्वी सावदा नगरपालिकेत नगरसेवक पदांसाठीच ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव होत्या. मात्र, आता थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर महिलांना स्पर्धा करण्याची ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सावदा शहरात पुन्हा एकदा ‘महिला राज’ प्रस्थापित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

महिलांच्या नेतृत्वाचा ठसा सावदा नगरपालिकेच्या इतिहासात पूर्वीपासूनच उमटलेला आहे. यापूर्वी नगराध्यक्षपदाचा मान सौ. माधुरी नेमाडे, सौ. नीता पाटील, सौ. ताराबाई वानखेडे, सौ. हेमांगी चौधरी, सौ. देवयानी बेंडाळे आणि सौ. अनिता येवले या महिला नेत्यांनी भूषविला आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनिक कामकाज, सामाजिक उपक्रम आणि नागरी सुविधा यांत लक्षणीय प्रगती झाल्याची नोंद आहे.

आता या परंपरेला अनुसरून प्रथमच अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने शहरातील राजकीय वातावरणात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.

येत्या निवडणुकीत भाजपच्या सौ. नंदाबाई लोखंडे (माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका), राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. सुभद्राबाई बडगे (माजी नगरसेविका) आणि सौ. सरिता ठोसरे (नवीन चेहरा, प्रथमच राजकारणात उतरणाऱ्या) या तीन प्रबळ महिलांची नावे पुढे येत आहेत. कोणत्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
दरम्यान, काही पक्षांतर्फे फक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

या निर्णयाचे शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि महिला संघटनांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. अनेक कार्यकर्त्या आणि युवा महिला आता निवडणुकीच्या रणसज्जतेत उतरल्या असून, सावदा नगरपालिकेच्या शतकपूर्तीनिमित्त ही घडामोड ‘सशक्त महिला नेतृत्वाची ‘सुवर्णसंधी’ ठरणार आहे.

आरक्षण जाहीर झाल्यापासूनच पडद्याआड जोरदार हालचाली सुरू झाल्या असून मोर्चेबांधणी देखील करण्यात येत आहे. तथापि, याबाबत कुणीही अद्याप समोर थेट भाष्य केलेले नाही. याचमुळे उमेदवारी कुणाला मिळणार आणि निवडून कोण येणार ? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.