मुक्ताईनगर-पंकज कपले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्ताईनगरातील कार्यक्रमात मुक्ताईनगर मतदारसंघासह रावेर लोकसभा क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक ४ मार्च रोजी दुपारी मुक्ताईनगर तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने तापी नदीवर मोंढाळदे ते सुलवाडी ऐनपुरच्या दरम्यान उभारण्यात येणार्या पुलाचे भुमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात एमआयडीसीचे भूमीपुजन आणि अन्य कामांचा शुभारंभ देखील होणार आहे. या कार्यक्रमाची अतिशय जोरात तयारी सुरू असून या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करत असल्याचे दिसून येत आहेत.
दरम्यान, याच कार्यक्रमात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमींग होणार असून हा प्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे. यात इतर पक्षांमधून सुमारे २० ते २५ मान्यवर नेते हे आपापल्या सहकार्यांसह शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात मुक्ताईनगर मतदारसंघासह रावेर लोकसभा क्षेत्रातील महत्वाच्या पदाधिकार्यांचा समावेश असल्याचे समजते. या संदर्भात शिवसेनेच्या सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून ऐन वेळेस मोठी नावे शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे आता या सभेची उत्सुकता अजून वाढीला लागली आहे.