भुसावळ न.प. सभेनंतर नगराध्यक्ष अन गटनेत्यांमध्येच शाब्‍दीक चकमक

bhusaval manpa

भुसावळ, प्रतिनिधी | येथील नगर परिषदेची विशेष सभा आज (दि.३०) सकाळी ११ वाजता नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यात रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनाशेजारी असलेल्या बैठक हॉलमध्ये सत्ताधारी गटनेते मुन्ना तेली व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यात विकास कामांवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. सत्ताधारी नेत्यांमध्ये वाद झाल्याने त्याची चर्चा दिवसभर शहरात सुरु होती.

 

न.प. सभेत गटनेत्यांना बोलायचे असताना नगराध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही. मात्र गटनेत्यांनी शहरातील झोपडपट्टी असलेल्या भागात डांबरीकरण होणार नसल्याची कैफियत मांडत तेथे आयपीएस वा पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. अजेंड्यावरील विषयात पुन्हा त्यांनी दुरुस्ती सूचवल्यानंतर सभागृहाने त्यास होकार दर्शवला होता.

शुक्रवारी पोळा सणाची धामधूम सुरू असताना नगराध्यक्ष रमण भोळे व भाजपा गटनेता मुन्ना तेली यांच्यात विकास कामांवरून झालेल्या शाब्दिक चकमकीची शहरभर चांगलीच रंगली. यापूर्वी सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी यांनी सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांना अडचणीत आणले होते तर आज पुन्हा गटनेत्यांनी नगराध्यक्षांशी विकास कामांवरून वाद केल्याने शहरात राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

शुक्रवारी नगर परिषदेची सभा असताना १०-४५ वाजता मुख्याधिकारी करुणा डहाळे सभागृहात येताच काही नगरसेवकांकडून बिले मंजूर होत नसल्याने वादंग सुरू होते तर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच मुख्याधिकारी लगेच माघारी गेल्या. त्यामुळे सत्ताधार्‍यांमधील कलगीतुरा शहरवासीयांसाठी चर्चेचा ठरला आहे. गटनेता व नगराध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आमच्यात कुठलेही मतभेद नाही, विकासासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगून त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Protected Content