‘मसाका’ अवसायनात काढण्याची घाई नको : निलेश राणे यांची मागणी

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्याची घाई न करता सभासदांना निधी उभारण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

सहनिबंधक सहकारी संस्था तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) संभाजीनगर यांनी दि. ११/१०/२०२३ रोजी मधुकर साखर कारखाना फैजपूर या संस्थेवर अंतरिम अवसायक नेमत असल्याचा अंतरिम आदेश काढला, त्यात नमुद केल्यानुसार संस्थेची निवडणूक घेण्यासाठी आवश्यक निधी जमवण्यासाठी निधी जमा होत नसल्याचे कारण नमूद केलेले आहे.

दरम्यान ही संस्था अवसायनात न काढण्यासाठी निलेश राणे , माजी नगराध्यक्ष फैजपूर यांनी प्रादेशिक सहसंचालक यांना मागणीचे पत्र दिले आहे. यात नम्हटले आहे की, मधुकर सहकारी साखर कारखाना हा कै.मधुकरराव चौधर व कै.जे.टी.महाजन यांच्या सारख्या महनीय व्यक्तीमत्वांच्या अहोरात्र केलेल्या मेहनतीतून उभारलेला असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माजी आमदार तथा खासदार कै.हरिभाऊ जावळे तसेच कै.पी.एन.चौधरी, कै.डिगंबर शेठ नारखेडे, यांच्यासारख्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्यकुशलतेतून सिंचित होत प्रगती होत चालवलेला आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही.

यात पुढे म्हटले आहे की, एवढ्या महनीय व्यक्तींच्या मेहनतीतून मोठ्या झालेल्या या संस्थेची निधी अभावी निवडणूक न झाल्याने संस्था अवसायनात जाणे व मधुकर हे नाव नष्ट होणे हि अत्यंत खेदाची बाब आहे. संस्था अस्तित्वात राहण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ जावळे, आमदार शिरीषदादा चौधरी हे सुद्धा सातत्याने प्रयत्नशील आहेत. यामळे ही संस्था आमच्या रावेर-यावल तालुक्यातील सभासदांसाठी भावनिक मुद्दा असल्याने संस्था अवसायनात न जाण्यासाठी व संस्थेचे ‘’मधुकर’’ हे नाव अस्तित्वात राहण्यासाठी संस्थेच्या निवडणुकीसाठी आवश्यक निवडणूक निधी जमा करण्यास आम्ही सभासद तयार आहोत.

दरम्यान, सदरचा निधी जमा करण्यास आम्हास दोन ते तीन महिन्यांचा वेळ देण्यात यावा जेणेकरून पूर्ण निधी जमा करणे शक्य होईल व संस्थेची निवडणूक होऊन संस्था जिवंत राहू शकेल. तसेच शासनाचा सहकार वाचवण्याचा उद्देशही यातून सफल होऊ शकेल. तरी मधुकर सहकारी साखर कारखाना ही संस्था अवसायनात काढण्याचा आदेश पारित न करता आम्हा सभासदांना निवडणूक निधी जमवण्यासाठी २-३ महिन्यांचा अवधी देऊन संस्थेची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी या निवेदनात निलेश राणे यांनी केली आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याचे प्रादेशिक सहसंचालक यांनी अवगत केलेले आहे.

Protected Content