टाकरखेडा शाळेत ‘एक पुस्तक-एक पणती’ वाटपाचा अनोखा उपक्रम

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत ‘एक पुस्तक, एक पणती’ वाटपाचा हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम नुकताच शाळेत घेण्यात आला.

शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी त्यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना  तसेच शिक्षकांना त्यांचा प्रकाशित चारोळी कविता संग्रह किलबिल हे पुस्तक तसेच सोबत एक पणती दिपावलीच्या निमित्ताने वाटप करण्यात आले.

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि मातीच्या पणतीचे  महत्व कळण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यामागचा उद्देश असल्याचे सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना आणि शालेय पोषण आहार शिजवणार्‍या स्वयंपाकी व मदतनीस यांना प्रत्येकी १ पुस्तक व १ पणती वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर बोलतांना सांगितले की, आनंदात प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा. दिवाळीच्या सुट्टीत कथा, कविता या पुस्तकांचे वाचन करा. दिव्याचे म्हणजे पणतीचे महत्व जाणून घ्या. वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो.शिक्षणाचे महत्व हे वाचनातून समजते.

यावेळी शाळेतील उपशिक्षक रामेश्वर आहेर यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या तर्फे खावून म्हणून चॉकलेट वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जयंत शेळके यांनी केले व आभार नाना धनगर यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, श्रीमती निर्मला महाजन उपस्थित होते.

Protected Content