स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारशीची गरज नाही

swatantryaveer savarkar

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात हे सूचक वक्तव्य केले आहे.

 

सावरकरांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आली आहे का? यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने महत्त्वाचा खुलासा केला आहे. केंद्राकडे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून भारतरत्न देण्यासंदर्भातील शिफारशी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. शिफारस केली नसतानाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. भारतरत्न देण्यासंदर्भातील निर्णय योग्यवेळी घेतला जातो. असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सावरकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या भाजपाच्या जाहीरनाम्यातही सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र सरकार शिफारस करणार असे नमूद करण्यात आले होते. सावरकरांना हा सन्मान देण्याची मागणी बऱ्याच काळापासून सातत्याने होताना दिसत आहे. मात्र या मागणीला काँग्रेसचा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केलेल्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारतरत्न पुरस्कार देण्याचे सर्व हक्क हे सत्तेत असणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे राखीव असतात. त्यामुळे हा पुरस्कार देण्यासाठी शिफारस करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयानुसार जी व्यक्ती या सन्मानासाठी योग्य पात्रतेची वाटते, त्या व्यक्तीला सरकार हा पुरस्कार देऊ शकते. या उलट ‘पद्म’ पुरस्कार देण्यासाठी समितीची नियुक्ती केली जाते. या समितीकडे आलेल्या शिफारशींमधून ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली जाते.

Protected Content