मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, मालेगाव, बुलढाणा, संभाजीनगर, नंदूरबार यांसह ठिकठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या नोंदणीसाठी पुण्याच्या भोरमध्ये तहसील आणि तलाठी कार्यालयात महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार उत्पन्न दाखला हा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. हा उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी तलाठी आणि तहसील कार्यालयात महिलांची तुडुंब गर्दी झाली आहे. या योजनेचा कालावधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 असा आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असणारा प्रत्येक जण कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.
या योजनेचा लाभ 21 ते 60 या वयोगटातील महिलांना मिळणार आहे. यासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असण्यासह आणखी काही निकष लावण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अनेक महिला तहसील कार्यालयासारख्या सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासून संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केली. ग्रामीण भागातून रिक्षा भरुन मिळेल त्या वाहनाने महिला कार्यालयात दाखल होत आहेत. या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र रहिवाशी दाखला, उत्त्पन्न दाखलासह अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. मालेगाव येथील नवीन तहसील कार्यालयात सकाळपासून महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. यामुळे सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे.