…तर राजीनामा देतो : विजय वडेट्टीवार

मुंबई | ओबीसी आरक्षणासाठी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पीपणाची असून आपल्या राजीनाम्याने आरक्षण मिळणार असेल तर आपण राजीनामा देणार असल्याचे विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला कॉंग्रेस जबाबदार नाही. याला भाजपच जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावं. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचं त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आधी रिक्त असलेल्या जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे. आम्हीही घोषणा केली आहे.  ओबीसी विरुद्ध ओपन होणार नाही. आता या पाच जिल्ह्याच्या मुद्द्यावरून जे काही राजकीय आकांडतांडव सुरू आहे ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यापलिकडे काही नाही.

 

Protected Content