मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबईत दुचाकी चोरून त्या मुक्ताईनगर तालुक्यात विकणार्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केली असून त्याच्या कडून तब्बल १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील रहिवासी सुनील चौधरी हा मुंबईसह परिसरात मोटारसायकलींची चोरी करून त्या मुक्ताईनगर परिसरात विक्री करत असे. या प्रकारे त्याने अनेक दुचाक्या विकल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याला ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस चौकशीत त्याने मुक्ताईनगर तालुक्यात आपण अनेक दुचाक्या विकल्याचे सांगितले.
या अनुषंगाने ठाणे येथील पोलिसांचे पथक त्याला आज मुक्ताईनगरात घेऊन आले होते. या पथकाने मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने तालुक्यात सुनील चौधरी याने विकलेल्या गाड्यांची झाडाझडती घेतली. यात तब्बल १६ चोरीच्या मोटारसायकली आढळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुनील चौधरी याने अजून अनेक दुचाक्या विकल्याची पोलिसांना शंका असून या दृष्टीने त्याची चौकशी सुरू आहे. तर, एकाच वेळेस तब्बल १६ चोरीच्या दुचाकी जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई ठाणे पोलिसांनी केली असून मुक्ताईनगर स्थानकाच्या पथकाने त्यांना सहाय्य केल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक शेवाळे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.