जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगरातील पडकी शाळेतील व्यायाम शाळेतून १५ हजार २०० रूपये किंमतीच्या सामानांची चोरी केल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शाहू नगरात पडकी मराठी शाळेत आझाद एकता नावाची व्यायाम शाळा आहे. या व्यायामशाळेत शाहू नगर व परिसरातील नागरीक व्यायाम शाळेत येत असतात. शनिवारी १२ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता व्यायामशाळा बंद करण्यात आली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी व्यायामशाळेच्या पाठीमागचा दरवाजा व खिडकी उघडून व्यायाम शाळेतील डंबेल, बार, प्लेटी व मशीनबार असा एकुण १५ हजार २०० रूपये किंमतीचा सामान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता व्यायामशाळेचे अध्यक्ष संदीप विलास वायकर हे व्यायामशाळा उघडण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना मागील बाजूस असलेला दरवाजा व खिडकी तुटलेली दिसून आली. तर व्यायामशाळेतील वस्तू चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.