भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या घरात चोरी

जळगाव प्रतिनिधी । भाजीपाला विक्री करण्यासाठी गेलेल्या महिलेचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून १५ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरातील साई गजानन अपार्टमेंटमधील सुमन भिमराव अहिरे या आपल्या मुलासोबत वास्तव्यास असून त्या भाजीपाला विक्री करुन उदनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी पहाटे पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भाजीपाला विक्री करण्यासाठी गेल्या होता. तसेच त्यांचा मुलगा सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास डी-मार्ट मध्ये कामाला निघून गेला. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्या महिलेचा मुलगा राजेश हा घरी आला असता त्याला घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उघडलेला असल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ ही घटना आईला सांगितली.

दरम्यान, त्यांनी घरात जावून बघितले असता घरातील गोदरेजच्या कपाट त्यांना उघडे दिसले आणि कपाटात ठेवलेली १५ हजार रुपयांची रक्कम याठिकाणी दिसून आली नाही.

घरात चोरी झाल्याचे समजताच सुमन अहिरे यांनी याबाबतची माहिती त्यांचे शेजारी किरण पाटील, वासुदेश शिरसाठ, स्वप्निल सोनार, शिरीष सोनवणे यांना दिली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरुन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गणेश शिरसाळे हे करीत आहेत.

Protected Content