चैन स्नाचिंगच्या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीस सुपूर्द; जिल्हापेठ पोलीसांची कामगिरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध भागातून चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपींकडून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते मूळ मालकांना सोन्याचे दागिने सुपूर्द करण्यात आले.

याबाबत माहिती अशी, जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून चॅन स्नॅचिंगचे प्रकार घडले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चार तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात ३ असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक सलीम तडवी, पोहेकॉ विकास पहुरकर, योगेश साबळे, समाधान पाटील यांनी सापळा रचून संशयित आरोपी संदीप रोहिदास सोनवणे (वय-३४) रा. नाशिक कामगार नगर, सातपूर, नाशिक आणि सतीश गोविंद चौधरी रा. कलेक्टर पट्टा मालेगाव यांना अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते.

शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या उपस्थितीत पाच जणांना मुद्देमाल देण्यात आला. यात प्रतिभा काटदरे रा. प्रेमनगर जळगाव, प्रमिला बालकिसन सोमाणी रा. चैतन्य नगर, सुनिता सुरेश पाटील रा. श्रीनिवास कॉलनी, सुनिता सुधाकर कुळकर्णी रा. गुरूकुल कॉलनी आणि माया दिपक निकम रा. शिवराम नगर जळगाव यांना पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्याहस्ते सोन्यांचा मुद्देमाल देण्यात आला. जिल्हा पेठ पोलीसांच्या पथकाने केलेल्या कामगिरीचे उपस्थित महिला आनंदित होवून कौतूक व आभार मानले. तर काहीच्या डोळ्यात आनंदाश्रू निघाले.

Protected Content