जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील एथर शोरूममध्ये चोरीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शोरूममध्ये हाऊस कीपिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक नितीन मोरे (वय-२९) हे जामनेर येथील एथर शोरूमचे मॅनेजर आहेत. घटनेच्या दिवशी, २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शोरूम बंद करून सर्व कर्मचारी घरी गेले होते. त्यानंतर, २१ एप्रिल च्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

शोरूममध्येच हाऊस कीपिंगचे काम करणारा संशयित आरोपी महेश राजेंद्र देवरे याने या कालावधीत कोणाच्याही संमतीशिवाय रात्रीच्या वेळी शोरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने लॉकर उघडून त्यातील १ लाख ६८ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. चोरलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या ३३६ नोटांचा समावेश आहे. सकाळी ही बाब लक्षात येताच मॅनेजर दीपक मोरे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून, जामनेर पोलिसांनी संशयित आरोपी महेश राजेंद्र देवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



