
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रशासकीय दिरंगाई आणि सुविधांचा अभाव यांमुळे जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील कर भरणा केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येला ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने वाचा फोडल्यानंतर, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बातमीची तातडीने दखल घेत स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केंद्राला अचानक भेट दिली आणि नागरिकांना तात्काळ दिलासा मिळवून दिला.

गेल्या काही दिवसांपासून कर भरणा केंद्रावर घरपट्टी आणि पाणपट्टी भरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड होत होती. तीनपैकी दोन खिडक्या बंद असल्याने रांगेत तासनतास उभे राहावे लागत होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था नव्हती, तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने उन्हाच्या काहिलीत नागरिकांच्या संतापाचा पारा चढला होता. या बिकट परिस्थितीवर ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
वृत्ताची गंभीर दखल घेत सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रभाग क्रमांक ४ च्या केंद्रावर धाव घेतली. तिथे प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कर्मचाऱ्यांची विचारणा केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तात्काळ सर्व खिडक्या सुरू करण्याच्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याची व बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या.
सभापतींच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे केंद्राचा कारभार अवघ्या काही तासांत बदलला. केंद्रावर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था आणि पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आणि ‘लाईव्ह ट्रेंडस’च्या पुढाकारामुळे नागरिक आता समाधानी आहेत. भविष्यातही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने अशीच तत्परता दाखवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



