जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेत आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रूपये असणारी तिजोरी पळवून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे संस्थेत बर्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. या अनुषंगाने आज पहाटे चार जणांनी संस्थेच्या कार्यालयात बळजबरीने प्रवेश मिळविला. त्यांनी संस्थेत झोपलेल्या कर्मचार्यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला. त्यांना तिजोरी न उघडता आल्यामुळे त्यांनी शेवटी तिजोरी घेऊनच पळ काढला. या तिजोरीत अडीच लाख रूपयांची रोकड असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजीव मुकुंदराव पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, चोरीची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संस्थेतील सीसीटिव्हीत चार चोरटे दिसून येत असून त्यांचा शोध आता सुरू करण्यात आला आहे.