मुंबई प्रतिनिधी । केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्या घरी काम करणा-या नोकराने त्यांच्या मुंबई येथे असलेल्या घरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोकराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवर व्हिला ओआरबी या इमारतीतील गोयल यांच्या घरातून १६ सप्टेंबर रोजी चांदीची भांडी, धातूच्या वस्तू, महागडे कपडे चोरीला गेले. १९ सप्टेंबरला त्यांच्या पत्नीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तपास करीत दिल्लीतून आरोपीस (नोकरास) अटक केली आहे. विष्णूकुमार विश्वकर्मा असे या नोकराचे नाव आहे. चौकशीमध्ये त्याच्याकडे या वस्तूसोबत एक हार्डडिस्कही सापडली. या हार्डडिस्कमधील काही डेटा विष्णूकुमार याने ईमेलवरून काही लोकांना पाठविल्याचे उघड झाले आहे. हा नेमका डेटा काय आहे आणि तो कुणाला पाठविण्यात आला, याचा तपास सुरू आहे.