आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक व महापूजेस बंदी

aalandi

 

पिंपरी वृत्तसंस्था । आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातील समाधीवर यापुढे महापूजा आणि अभिषेक करता येणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय (दि.२७ डिसेंबर) रोजी घेण्यात आला असून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यापुढे भाविकांना मंदिरात माऊलींच्या पादुकांचे पूजन आणि अभिषेक करावा लागणार आहे. समाधी मंदिरातील समाधीची होत असलेली झीज विचारात घेऊन विश्वस्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी दिली.

माउलींच्या ऐतिहासिक संजीवन समाधीचे चिरकाल व चिरंतन जतन, संवर्धन करण्यासाठी समाधीवरील अभिषेक आणि महापूजांची संख्या मर्यादित करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने यापुढे समाधीऐवजी पादुकांचे पूजन केले जाईल. अशाप्रकारे बदल करण्याचा निर्णय आळंदी देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. अभिषेक करताना वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यामुळे संजीवन समाधीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला असून तसा अहवाल पुरातत्त्व विभागानेही दिला असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आले. आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दीचाही विचार हा निर्णय घेताना करण्यात आला आहे. या निर्णयाला आळंदीमध्ये काही जणांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून काही दिवस या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content