उद्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या शुक्रवार दि.३१ डिसेंबर रोजी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचे जिल्हा परिषदेच्या प्रशसकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.सदर मागण्यांबाबत जिल्हा परिषदकडे संघटनेने वेळोवेळी लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला आहे.परंतु जिल्हा परिषदेने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.३१ डिसेंबर रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात लस टोचणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आशा स्वयंसेविकांना कोव्हिड लसीकरणाचा मोबदला अदा करण्यात यावा, सन २०२०-२१ आणि २०२१-२०२२ यावर्षीचा क्षयरोग आणि कुष्ठरोग सर्वेक्षणाच्या कामाचा थकीत मोबदला मिळावा. दि.९ सप्टेंबर २१ च्या शासन आदेशानुसार आशाताईं आणि गटप्रवर्तकांना जुलै २०२१ पासून केलेली मानधन वाढ आणि कोविड भत्ता थकबाकीसह लागू करण्यात यावा. सप्टेंबर २०२१ पासूनची आशा स्वयंसेविका २०००/-आणि गटप्रवर्तक ३०००/- पासून थकीत मानधनाची रक्कम तातडीने अदा करावी. दि.१३ ऑक्टोबर २०२० च्या पत्रानुसार आरोग्यवर्धिनी टिमबेस अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सन २०२० पासूनचे थकीत मानधन थकबाकीसह लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या गणवेश खरेदीमध्ये वरिष्ठांचा हस्तक्षेप बंद करावा. एनयुएचएम अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आरोग्य वर्धिनीच्या कामाचा मोबदला लागू करावा तसेच नोव्हेंबर २०२१ पासून कामाचे सर्व थकीत मानधन अदा करून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची होणारी उपासमार थांबवावी.यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी सकाळी ११.०० वाजेपर्यंत जिल्हा परिषद जळगाव येथे गणवेश परिधान करून बहुसंख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन कल्पना भोई, भागिरथी पाटील,सुनंदा पाटील सुनिता भोसले,भारती नेमाडे,रेखा सोनवणे,सुनंदा हाडपे,संगिता पाटील,भारती तायडे,उषा पाटील,अनिता कोल्हे, सुनिता विनंते,माया खैरनार,योगिता बारी,रेखा तायडे,आशा पोहेकर भारती चौधरी,करूणा कुमावत,भारती पाटील आदींनी केले आहे.

Protected Content