


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गांधी नगरातील नटराज सिनेमा हॉल जवळून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नितीन रामेश्वरलाल जागीड (वय-२३) रा. वाघ नगर, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करुन आपला उदरनिर्वाह करतो. रविवार २६ जून रोजी सकाळी १० वाजता नितीन हा (एमएच १९ बीव्ही ८७०२) या दुचाकीवरून शहरातील गांधीनगर येथे नटराज सिनेमाजवळ आला होता. त्यावेळी दुचाकी पार्क करून लावली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. दुपारी ४ वाजता नितीन हा दुचाकी जवळ आला असताना त्याला दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला तरी देखील दुचाकी न मिळाल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. नितीन जागीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक युनुस तडवी करीत आहे.



