यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घरकुलचा हप्ता मिळत नसल्याने एका युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या युवकाने पंचायती समितीच्या कार्यालयातच स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत हस्तक्षेप करत गटविकास अधिकारी आर.आर. खरोडे यांनी त्या युवकांची समजूत काढली आहे. संतोष उकंडराव बुटले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ही घटना यवतमाळ जिल्हयातील आर्णी पंचायत समितीच्या कार्यालयात घडली असता परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, जिल्हयातील आर्णीच्या माळेगाव येथे संतोष बुटले यांचे वडील उकंडराव बुटले यांना घरकूल योजनेतून घर मिळाले आहे. त्यासाठी त्यांना योजनेच्या माध्यमातून १५ हजार रूपये मिळाले होते. मात्र दुसरा हफ्ता देण्यास पंचायत समितीचे अधिकारी वेळोवेळी विनंती करून ही टाळाटाळ करीत होते, असा आरोप बुटले यांनी केला. वडिल वयोवृद्ध असल्याने त्यांना कायम ये-जा करणे शक्य होत नव्हते. दूसरा हप्ता मिळावा यासाठी संतोष बुटले याने वेळोवेळी पाठपुरवठा सुरु ठेवला. परंतू सर्व प्रयत्न करून ही अखेर संतापात बुटले यांनी टोकाचे पाऊल उचलत आर्णीच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्येच स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखात मोठा अनर्थ टाळला.