जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात राहणाऱ्या वीस वर्षीय तरूणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जावून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धीरज प्रभाकर कोष्टी (वय-२०) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरात धीरज कोष्टी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. तो सध्या बीसीए वर्गात शिक्षण घेत होता. शनिवार ८ जुलै रोजी सायंकाळी धीरज हा आपल्या आई वडील यांच्यासोबत होता. त्यानंतर त्याने राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावर जावून दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. स्थानिक नागरीक व शेजारी राहणाऱ्या मित्रांनी धाव घेवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत सैदाणे आणि शरीफ शेख करीत आहे. मयत तरूणाच्या पश्चात आई कांताबाई, वडील प्रभाकर कोष्ठी, तीन बहिणी असा परिवार आहे.