चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बिलाखेड शिवारात ७ हेक्टर जागेत सन २०१६ मध्ये वनोद्यान व हायटेक रोपवाटिका माजी उपमुख्यमंत्री स्व.उत्तमराव पाटील यांच्या नावाने उभारण्यास सुरुवात करण्यात आली होती.
सदर उद्यानाचे काम आता अंतिम टप्यात असून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने वनोद्यानाच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर झाला असून अटल आनंद घन–वन योजनेतून सुमारे ३० हजार वृक्षांची लागवड व जतन करण्यात येत असून येत्या २१ मार्च जागतिक वन दिनी सदर वनोद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहेत.
चाळीसगाव येथील बिलाखेड शिवारात ७ हेक्टर जागेत सन २०१६ मध्ये वनोद्यान व हायटेक रोपवाटिका उभारण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा केला होता. मध्यंतरीच्या काळात निधीअभावी काम बंद होते. आता भरघोस निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यातील वाघळी गावाचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व.उत्तमराव पाटील यांच्या नावाने भाजपा नेते व तत्कालीन वनमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांनी उत्तमराव पाटील वनोद्यान योजना सुरु केली होती.
मध्यंतरी नीधीच्या अभावामुळे काम बंद होता. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यानंतर आता निधी मंजूर झाला आहे. शहराजवळ असणाऱ्यांना या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वनोद्यानाची पाहणी करत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.
येत्या २१ मार्च या जागतिक वन दिनी सदर वनोद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विभागीय वन अधिकारी आय.सी.शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय साळुंखे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.वनोद्यान निर्मिती योजनेला विद्यमान राज्य शासनाने सन २०२२-२३ पर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय दि.३ फेब्रुवारी २०२१ रोजी शासनाने काढला असून योजनेसाठी निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती.
आमदार मंगेश चव्हाण यांनी वनोद्यानाची पाहणी करत असताना उद्यानाला संरक्षण म्हणून जे जाळीचे कुंपण करण्यात आले आहे. ते निकृष्ठ दर्जाचे असल्याने ठिकठिकाणी तुटले असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच यापूर्वी उद्यानाच्या सभोवताली कच्चा रस्ता तयार करण्यात आल्याने पुन्हा त्याच कामासाठी निधी खर्च करण्यात येत असल्याने सदर रस्ता अधिक टिकाऊ कसा होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.