निष्पक्ष चौकशीसाठीच संजय राठोडांचा राजीनामा-मुख्यमंत्री

 

मुंबई प्रतिनिधी । पूजा चव्हाण प्रकरणात सत्य काय ते समोर आणण्यासाठी पोलिसांचे निर्देश देण्यात आले आहेत. निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणूनच संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. 

 

विधीमंडळ अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून मीडियाशी संवाद साधला.  मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच कोरोनाचा संसर्ग आढळून आला होता. यानंतर एक वर्ष कसे गेले हे कळलेच नाही. सध्या देखील खूप रूग्ण आढळून येत आहेत. म्हणजे हे संकट पूर्णपणे टळलेले नाही. ८ रोजी उपमुख्यमंत्री अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याची माहिती उध्दव ठाकरे यांनी दिली.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप हे किव करण्यासारखे आहेत. यात त्यांनी कोरोनाच्या प्रतिकारात राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप हास्यास्पद केला आहे  या प्रकारचा दुतोंडी विरोधी पक्ष आपण कधीही पाहिला नव्हता, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला. तर सावरकरांची जयंती वा पुण्यतिथी माहिती नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली.  विरोधी पक्षांनी पेट्रोल व डिझेल दरवाढी वर देखील बोलावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.

 

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यात गलीच्छ राजकारण सुरू आहे. एखादे गैरकृत्य झाल्यास याचा तपास झालाच पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र यातून कुणावरही अन्याय होता कामा नये. संजय राठोड यांनी आज स्वत:हून राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात यावा असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या क्षणी ही घटना आम्हाला माहित झाली, त्याच क्षणाला याचा निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. याचा तपास लवकरात लवकर करून सत्य समोर यावे असे निर्देश आम्ही पोलिसांना दिलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. पोलीसांसह इतर यंत्रणा हा सरकारच्या कणा आहेत. यावर अविश्‍वास दाखविणे चुकीचे आहे. पूजाचे आई-वडील व भाऊ आज आपल्याला भेटल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चव्हाण कुटुंबियांनी दिलेले पत्र या प्रसंगी वाचून दाखविण्यात आले.

 

या पत्राचा संदर्भ घेत मुख्यमंत्री म्हणाले की, पूजाच्या कुटुंबियांनीही राठोड यांच्यावर संशय व्यक्त केला नसून आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. यानुसार तपास होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर वनखात्याचा कार्यभार हा आपल्याकडेच असेल असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Protected Content