‘शेळगाव बॅरेज’चं काम अंतिम टप्यात

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी । यावलसह, भुसावळ आणि जळगाव तालुक्यास वरदान ठरणाऱ्या ‘शेळगाव बॅरेज’चं काम अंतिम टप्यात आलं असून धरणाचे दरवाजे बसविण्याचे काम जोमात सुरू आहे. एकूण १८ पैकी १० दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण झालं असून आगामी जून महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन यावर्षी पावसाळ्यातील तापी नदीपात्रातून वाहून जाणारं पाणी शेळगाव बॅरेज प्रकल्पात अडविलं जाणार आहे.

याचा यावलसह, भुसावळ, व जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तापी नदीवर १९९८ पासून रखडलेल्या ‘शेळगाव बॅरेज’ प्रकल्पास मार्गी लावण्यासाठी तत्कालीन खासदार, तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी १९९९ पासून या ‘शेळगाव बॅरेज’ प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. त्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची साथ मिळाली. सन २०१६ मध्ये ६९९ कोटी रुपयांच्या या प्रकल्पास सध्या ९६८ कोटी कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून गरजेनुसार यास निधी मिळवून देण्यात आला आहे.

‘२०१२’ मधील पूर परिस्थिती पाहता ‘२०१७’ मध्ये बॅरेजच्या दरवाजांचं सुधारित डिझाइन तयार करण्यात आलं. ४.११ टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असून या प्रकल्पामुळे ११ हजार ३१८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचा समावेश ‘बळीराजा जलसंजीवनी योजने’त केला असून या योजनेअंतर्गत भव्य निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आता या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी रावेर, यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे देखील प्रयत्नशील आहेत. बॅरेज प्रमाणेच आता बॅरेजजवळील पूल उभारणीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा व लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त होत आहे.
…………………………..
शेळगाव बॅरेज अंतर्गत विविध ठिकाणी चार नवीन पूल बांधणे नियोजित आहे. यापैकी ९४ कोटी ९५ लाख रुपये खर्चाच्या तीन पुलांची निविदा प्रसिद्ध होऊन त्यात यावल भुसावळ दरम्यान ‘अंजाळे’जवळील ‘मोर’ नदीवर मोठा पूल उभारणीसाठी ५३.०९ कोटी रुपये, ‘कडगाव- जोगलखेडा वाघूर नदी’वर २०.९४ कोटी, ‘भुसावळ -पिळोदा मोर नदी’वर २०.४२ कोटी खर्चाचे पुलाचे काम झाले आहे. यापैकी तापी नदीवर जळगाव- शेळगाव – बामणोद जिल्हा मार्गावर ३९.११ कोटी रुपये खर्चून पूल उभारण्यात येणं महत्त्वाचं असून त्यामुळे यावल ते जळगाव अंतर कमी होणार आहे.
…………………………..
‘शेळगाव बॅरेज’मधील पाणी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ३९.७१६ दशलक्ष घनमीटर तर उन्हाळी हंगामासाठी ३८.५५७ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाईल. जळगाव औद्योगिक वसाहतीसह तेरा गावांना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी मिळेल.
……………………………
‘शेळगाव बॅरेज’मुळे तापी नदीचे उत्तरेकडील सातपुडा पर्वत भागाकडील भागात खालावलेली भूगर्भातील भूजल पातळी वाढण्यासाठी मदतच होणार आहे. नदीच्या बॅकवॉटरमुळे ‘अंजाळे’ शिवारात नियमित थेट फैजपूरपर्यंत पाणी राहील. भुसावळ जवळील तापी नदीला सतत पाणी असेल. या बॅरेज वरून येथे शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात येणार आहे. येथील पालिकेने शेळगाव बॅरेज वरून पाणी आणण्यासाठी ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. यामुळे शहराची तहान भागवणे अधिक सोपे होणार आहे.
………………………………….
एकूण ४.११ टीएमसी (११३.३६६ दशलक्ष घनमीटर) क्षमतेच्या आणि १८ वक्राकार दरवाजे असलेल्या शेळगाव बॅरेज ची एकूण लांबी १०४३.६५ मीटर आहे.
४.११ टीएमसी पैकी ३.०९२ टीएमसी सिंचनासाठी (११,३१८ हेक्टर), ०.५९६ टीएमसी बिगर सिंचन, ०.२४३ टीएमसी औद्योगिक वापरासाठी होईल.
बॅरेजचा उपयुक्त जलसाठा ११०.३४८ दशलक्ष घनमीटर ( ३.९०टीएमसी) आणि मृतसाठा ६.०९८ दशलक्ष घनमीटर ( ०.२१टीएमसी) आहे.
………………………………
या प्रकल्पाची मूळ प्रशासकीय किंमत १९९७ – ९८ मध्ये १९८ कोटी पाच लाख होती. २०११- १२ मध्ये ती किंमत ६९९ कोटी ४८ लाखांपर्यंत गेली. तिला प्रशासकीय मान्यता मिळाली. २०१६ -१७ मध्ये द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता ९६८ कोटी ९७ लाख ठेवण्यात आली ती २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली.

Protected Content