देशातील साडेसात कोटी वृद्ध गंभीर आजारांनी त्रस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील तब्बल साडेसात कोटीहून अधिक वयोवृद्धांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचे गंभीर आजार असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

लॉन्गिट्युडनल एजिंग स्टडी इन इंडिया या नावानं हा सर्व्हे करण्यात आला. अशाप्रकारचा हा जगातील सर्वात मोठा सर्व्हे आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. २०१७ – १८ सालात हा सर्व्हे करण्यात आला. ज्याचा पहिला भाग बुधवारी प्रकाशित करण्यात आला.

सिक्कीम वगळता भारतातील सर्व राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. ४५ वर्षांहुन अधिक वय असणाऱ्या ७२ हजार २५० व्यक्तींचा यामध्ये समावेश होता. त्यातील ३१ हजार ४६४ लोकांचं वय ६० वर्षांहून अधिक होतं. तर यातील ६ हजार ७४९ लोकांचं वय ७५ वर्षांहून अधिक होतं.

देशातील तब्बल २५ टक्क्यांहून अधिक लोकांना जीवघेणे आजार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तर ४० टक्के वृद्ध कुठल्या ना कुठल्या अपंगत्त्वाचे बळी असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. याशिवाय २० टक्के वृद्ध व्यक्तीं मानसिक आजारांचे बळी आहेत. त्यामुळं वयोवृद्ध व्यक्तींची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

वयोवृद्धांवरील या अहवालाचा उपयोग योजना बनवण्यासाठी केला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. या अहवालाद्वारे वृद्धांचा शारीरीक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर अभ्यास केला गेला. याचा उपयोग करुन वृद्धांसाठी योजना तयार केल्या जाणार आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण लोकसंख्येच्या ८ . ६ टक्के लोक ६० वर्षांहून अधिक वय असलेले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० .. ३० कोटी होती. म्हणजेच दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत ३ टक्क्यांची वाढ होत आहे. ही वाढ अशीच सुरु राहिली, तर २०५० पर्यंत भारतात तब्बल ३१ . ९० कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. त्यामुळं या नागरिकांसाठी विविध योजना तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

अनेक वयोवृद्धांना हायपरटेन्शन, दृष्टीची समस्या, वजनवाढीची समस्या, कुपोषण, श्वासासंबंधीचे आजार असे अनेक आजार असल्याचं समोर आलं. गंभीर आजारांनी ज्यांना ग्रासलं आहे, त्यातील ७७ टक्के लोकांना हायपरटेन्शन, ७४ टक्के लोकांना हृदयासंबंधीचे आजार, ८३ टक्के लोकांना मधुमेह, ७२ टक्के लोकांना श्वासासंबंधीचे आजार, तर ७५ टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचा कॅन्सर असल्याचं समोर आलं. याशिवाय ५८ टक्के लोकांना स्ट्रोक, तर ५६ टक्के ज्येष्ठांना संधीवाताचा त्रास असल्याचंही कळालं. याशिवाय ४१ टक्के ज्येष्ठ नागरिक मानसिक आजारांना बळी पडल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळतात. त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची अजूनही वाणवा असल्याचं समोर आलं. सामाजिक सुरक्षेचा विचार केला तर छोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वृद्धांसाठी अधिक सुरक्षित असल्याचं या सर्व्हेत समोर आलं आहे. मोठ्या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेकडे फार कमी लक्ष दिलं जात असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

Protected Content