राज्यात ऑनलाईन जुगारावर हवी बंदी !

नागपूर   | ऑनलाईन जुगारामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याने यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

 

सध्या ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडत आहेत. विद्यार्थी, नोकरदार आणि काही व्यावसायिकही ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेले आहेत. कायद्याने बंदी नसल्याने हा ऑनलाईन जुगार सर्रास सुरु आहे. या अनुषंगाने राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

कर्नाटक सरकार ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारा कायदा आणत आहेत. यामुळे महाराष्ट्रातही अशा स्वरूपाचा कायदा हवा अशी मागणी आता होऊ लागली आहे. देशात ऑनलाईन जुगारावर बंदी नाही. मात्र २०१७ मध्ये कायद्याने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरले होते. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांनी केवळ गेल्या एका वर्षात ऑनलाईन जुगारावर बंदी आणण्यासाठी कायदे आणि सुधारणा आणल्या. मात्र महाराष्ट्रात अजूनही ऑनलाईन जुगार सुरू असल्याने अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत असून यावर कायदा करावा असे विजय वडेट्टीवार यांनी सुचविले आहे.

Protected Content