ड्रग्ज रॅकेटचा सगळा खेळ गुजरातहून? : नवाब मलिक

मुंबई प्रतिनिधी | गुजरातमध्ये ३५० कोटी रूपयांचे ड्रग सापडल्यामुळे ड्रग रॅकेटचा सगळा खेळ हा गुजरातमधून चालतो का ? असा प्रश्‍न उपस्थित करत अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले की, आज गुजरातच्या द्वारकामधून तब्बल ३५० कोटी किमतीचं ड्रग्ज सापडल्यामुळे आता गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनू लागलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.  मुंद्रानंतर द्वारकामध्ये देखील ३५० कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. हा योगायोग आहे का? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये नोवाटेल आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिले आहेत. गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. हे सगळे ड्रग्जच्या खेळाचे खेळाडू आहेत. आता असा प्रश्न उभा राहातो की ड्रग्जचा खेळ गुजरातहून तर नाही ना चालत? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

 

दरम्यान, राज्यातून ३ ग्रॅम, २ ग्रॅमची कारवाई करून, सेलिब्रिटींची परेड करून लोकांचं लक्ष विचलित केलं जावं आणि गुजरातमधून ड्रग्जचा धंदा अविरतपणे चालत राहावा असं नियोजन आहे का ही शंका लोकांच्या मनात उभी राहात आहे. एनआयएकडे मुंद्रा पोर्टचा तपास आहे. द्वारकामध्ये साडेतीनशे कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. आशा आहे की याचा तपास योग्य दिशेने होईल. कोण किती मोठा आहे, किती प्रभावी आहे, कोणत्या पक्षाचा नेता आहे हे न पाहाता एनआयए आणि एनसीबीचे विभागीय संचालक किंवा एनसीबीचे डीजी योग्य पद्धतीने तपास करावा. ड्रग्जची सगळी खेप गुजरातमधून येत असेल, देशात पसरत असेल, तर एनसीबीचे डीजी यावर कारवाई करतील आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम करतील, अशी आशा आहे, असे देखील मलिक यावेळी म्हणाले.

Protected Content