पाचोरा प्रतिनिधी । देशमुखवाडीत तिसऱ्या पिढीचा जन्म होण्याची वेळ असून अनुसूचित जमातमधील रहिवाशांना ज्यांना जात प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड मिळाले नाहीत. दरम्यान, त्यांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आ.किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे यांच्या प्रयत्नाने प्रथमच मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाची दार न पाहिलेल्या या आदिवासी समाजातील तिसऱ्या पिढीतील पाल्याना शिक्षणासह विविध योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांनी आमदार, प्रांत अधिकारी व तहसीलदारांचा पुष्पहार देऊन स्वागत केले व आभारही मानले. यावेळी त्यांच्या डोळ्यात आंनदाश्रू पहावयास मिळाले. पाचोरा येथील कै. सुपडू भादू प्राथमिक विद्यालयाच्या मागील बाजूस गेल्या तीन पिढ्यांपासून १०० ते १२५ कुटुंब अतिक्रमित जागेत वस्ती करून राहत आहेत. मूळचे नागपूर येथील वास्तव्य असलेला या समाजाचे पाचोरा पालिकेत साध्यस्थीतीत ४०० मतदार असून गौंड समाज बांधव मिळेल ते काम करणे, कानातील मळ काढणे तर महिला पोळ्याच्या सनापासून ते संक्रांतीपर्यंत नांदेड, हिंगोली, वाशिम, मेहकर, अकलूज, लातूर, उदगीर पर्यंत खारीक, खोबरे व मसाल्याचे पदार्थ विकून उदरनिर्वाह करतात. या समाजातील पुरुष व महिलांचे वर्षभरातील किमान ६ ते ८ महिने भटकंती वरच निघतात. यामुळे त्यांच्या मुलांचा शिक्षणाशी फारसा संबंध येत नाही. या गौंड समाजाची भाषा भारतातील अन्य कोणत्याही भाषेशी संलग्न नाही. गेल्या दीडशे वर्षांपासून त्यांना रेशनिंग कार्ड, विविध जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले या गोष्टी तर दूरच मात्र अद्याप आदिवासी समाज असूनही एकाचाही शासनाच्या विविध प्रकारच्या घरकुल यादीत समावेश झालेला नाही.
पाचोरा येथील तहसिल कार्यालयात सोमवारी महाराजस्व अभियानांतर्गत गौंड समजतील आदिवासी बांधवाना ७० जातीचे दाखले, २० उत्पन्नाचे दाखले, १५ रेशन कार्ड, १० नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख उपस्थितीतांमध्ये नगराध्यक्ष संजय गोहिल, शहराध्यक्ष किशोर बारावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, संघायोचे नायब तहसीलदार भागवत पाटील, पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार पूनम थोरात , पुरवठा निरीक्षक अभिजित येवले, पुरवठा अववल कारकून, उमेश शिर्के, मंडळाधिकारी वरद वाडेकर, प्रशांत पगार, तलाठी आर. डी. पाटील, महा ईसेवा केंद्राचे संचालक मनोज महाजन सह गौंड समाजातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार कैलास चावडे तर सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षक अभिजित येवले यांनी केले.
गौंड समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला- वच्छीलाबाई मेश्राम
आमचा समाज गेल्या तीन पिढ्यांपासून पाचोरा शहरात अतिक्रमण करून राहत आहेत. समाजाला आजपर्यंत शासनाच्या योजनांचा एकही लाभ मिळालेला नाही. पिढ्यानपिढ्या आमचे लोक अशिक्षित राहून मेहनत करून पोटाची खळगी भरतात मात्र आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे हे आम्हाला देवासारखे मदत करीत असून आम्हाला विविध दाखले मिळाले. आता आमची मुलेही शिक्षण घेऊन साहेब होतील.
समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू- नगरसेवक धर्मेंद्र चौधरी
शहरातील गौंड समाज हा अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात वासतव्य करून राहत आहेत. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या अनेक सुख दुःखात सहभागी होऊन लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमदार किशोर पाटील व उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी प्रथमच या समाजाला जातीचे दाखले देऊन शिक्षणासाठी वाट करून दिली आहे. यापुढेही आमदार किशोर पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ देण्याचा मानस आहे.