पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे कवि संमेलनात कविता सादर करण्यासाठी जाणार्या चिमुकलीचा आयशरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला असून तिचे वडील जखमी झाले आहेत. या अपघातामुळे संतप्त झालेल्या पहूर येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे सर हे आपल्या सायकलने मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिस बस स्टॅन्ड वर घेऊन येत होते. याप्रसंगी भरधाव वेगाने येणार्या आयशर क्रमांक एम. एच. २३ ऐ.यु ५५८२ या गाडीवरील चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून गाडीने जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे व त्यांची कन्या ज्ञानेश्वरी रस्त्यावर फेकले गेले यात पाचवीत शिकणार्या ज्ञानेश्वरी भामरे ही फेकल्या गेल्याने तीचा जागीच मृत्यु झाला. तर शंकर भामेरे सर हे जखमी झाले. अपघातात मृत्यू झालेल्या ज्ञानेश्वरी ही आज जळगाव येथे स्वतः लिहिलेल्या कविता सादर करण्यासाठी कवी संमेलनाला जात होती. तिला सोडण्यासाठी वडील शंकर भामरे येत असतानाच आयशरने धडक दिल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला.
शंकर भामरे सर विज्ञान प्रदर्शनासाठी जात होते. शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आयशर चालक सुनिल ज्ञानदेव सोनवणे (राहणार अंजनवटी तालुका जिल्हा बीड ) यास पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पहूर बस स्थानक परिसरात ‘रास्ता रोको’
दरम्यान, या अपघातामुळे पहूर परिसरातून प्रचंड संतापाची लाट उसळली. सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे त्याचाच बळी ज्ञानेश्वरी ठरली आहे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या वाघूर नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणार्या जाणार्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहेत. या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी अंत्यसंस्कार आटोपताच पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, महेश पाटील, आदींनी संतप्त भावना व्यक्त करून रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी केली. तर, रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.