पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने गाजीपूर (उत्तर प्रदेश) येथील ३५ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंदू लच्छीराम गुप्ता (वय – ३५) रा. गाजीपुर (उत्तर प्रदेश) हे दि. ६ ऑगस्ट रोजी कल्याणहून वाराणसी येथे जाण्यासाठी रेल्वेत बसले. दुपारी १ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३७८ / २१ / २३ नजीक डाऊन ट्रकवर धावत्या रेल्वेतून पडल्याने चंदू गुप्ता दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा केला. चंदु गुप्ता यांचा मृतदेह पाचोरा येथील रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक तुषार विसपुते हे करीत आहे.