जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील गुजरात पेट्रोल पंपाजवळील एन.एन. वाईन सेंटर दुकानात तोडफोड करून वाईन शॉपच्या काउंटरमधून ५ लाख ७० हजार रुपयांची रोकड जबरी घेऊन चोरी केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली होती. या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पाळधी गावातील साई मंदीर परिसरातून अटक केली आहे. सचिन अभयसिंग चव्हाण वय-२६ आणि अक्षय नारायण राठोड वय-२२ दोन्ही रा. पिंप्राळा, जळगाव असे अटक केलेले संशयित आरोपींची नावे आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गुजरात पेट्रोल पंपाजवळील वाईन सेंटर येथे १५ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी सचिन चव्हाण आणि अक्षय राठोड यांनी फुकट बियरची बाटली मागितली होती. त्यामुळे दुकानदाराने बियरची बाटली दिली नाही. याचा रागातून सचिन चव्हाण आणि अक्षय राठोड यांनी दुकानदारासोबत वाद घातला. त्यानंतर दुकानात तोडफोड करण्यात आली आणि दुकानातील काऊंटरमधून सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांची रोकड जबरी काढून पसार झाले. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपी हे पाळधी गावातील साई मंदिर परिसरात असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पाळधी गावात जाऊन संशयित आरोपी सचिन चव्हाण आणि अक्षय राठोड या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बुलेट दुचाकी जप्त केले आहे.
पुढील कारवाईसाठी दोघांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार विजय पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील यांनी केली आहे.