जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने घरी जाणाऱ्या तरूणाला अज्ञात वाहनाच्या जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुपारी घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोपान सुभाष शिरसाठ (वय-२५) रा. कुसुंबा ता. चोपडा ह.मु. देवगाव ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या आईवडीलांसह राहतो. शेतीकाम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. आज बामणोद ता. यावल येथे सोपानच्या चुलत मामाचा साखरपुडा होता. आई जनाबाई ह्या आजारी असल्यामुळे सोपान शिरसाठ हा साखरपुड्याला जाण्यासाठी दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीएम ६६५३)ने सकाळी घरून निघाला. दरम्यान, सोपान हा साखर पुड्याला न जाता जळगावातील पाळधी येथे मामा वासुदेव नामदेव सोनवणे यांच्या ढाब्यावर आला. त्याठिकाणी मामा भेटले नाही म्हणून सोपान दुचाकीने देवगाव येथे जाण्यासाठी निघाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळून दुपारी ४ वाजेच्या सुमारास जात असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात सोपान जागीच ठार झाला.
सोपान हा अविवाहित असून आईवडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहे. आई जनाबाई आणि वडील सुभाष उत्तम शिरसाठ हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. घटनेची माहिती मिळतात कैलास नामदेव सोनवणे आणि वासूदेव नामदेव सोनवणे रा. सत्यम पार्क हे दोन्ही मामांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली व ओळख पटली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.