फ्लोरिडा वृत्तसंस्था । नुकताच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोघ संघ पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहेत. आजपासून ट्वेंटी-20 सामना रंगणार असून तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत.
ट्वेंटी-20 मालिकेत कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी शर्यत पाहायला मिळणार आहे. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्यानं 94 सामन्यांत 32.37च्या सरासरीनं 2,331 धावा केल्या आहेत. रोहितचा हा विक्रम कोहलीला मोडण्याची संधी आहे. कोहलीनं 67 सामन्यांत 50.23च्या सरासरीनं 2263 धावा केल्या आहेत. या क्रमवारीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील 2272 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि कोहली हा विक्रम आज मोडू शकतो. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात दुसरे स्थान पटकावण्यासाठी कोहलीला 10 धावांची गरज आहे, तर रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 68 धावा कराव्या लागतील.