Breaking : शाळेची संरक्षण भिंत पडल्याने १३ वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संरक्षण भिंत पडल्याने एक १३ वर्षीय मुलचा दबून जखमी होवून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केले आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा., अळी नशिराबाद ता, जळगाव) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, मोहित हा आईवडील व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्या कारणामुळे तो घरी होता. शुक्रवारी ३१ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मित्रांसोबत सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेळत होता. खेळताखेळता अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान त्याचा प्राणज्योत मालविली. मुलाचा मृत्यू झाल्याने आईवडीलांना हंबरडा फोडला होता. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदार याच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेड यांनी केला होता. मयताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई असा परिवार आहे. तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहे.

Protected Content