पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी इतरत्र बांधण्यात यावी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निपाणे येथे पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. ज्या जागेवर टाकी बांधण्यात येणार आहे ती जागा दलितवस्ती लगत असल्यामुळे व त्या जागेवर दलित समाज बांधव विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रम करत असतात. त्याच ठिकाणी टाकी बांधकाम झाल्यास समाज बांधवांना कार्यक्रम घेण्यास दुसरी जागा नसल्याने पिण्याच्या पाण्याची टाकी परिसरात इतरत्र बांधण्यात यावी. या रास्त मागणीसाठी ३१ मार्च रोजी समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी व स्थानिक समाज बांधवांतर्फे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देते प्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, पाचोरा तालुका मा. महासचिव सुनिल सुरळकर, डिगबंर धनुर्धर, शंकर सोनवणे, समाधान धनुर्धर, सुभाष चव्हाण, दशरथ धनुर्धर, चंद्रभान धनुर्धर, ज्ञानेश्वर भालेराव, संतोष खैरे उपस्थित होते.

निपाणे ता. पाचोरा येथे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गावातील काही समाज कंटकांच्या माध्यमातून एका दलित वृद्ध महिलेच्या अंत्यविधीसाठी मज्जाव केला होता. व त्यामुळे महिलेचा अंत्यविधी इतरत्र करण्यात आला. या घटनेच्या विरोधात जन आंदोलन करुन या घटनेतील समाज कंटकांवर गुन्हे दाखल होवुन सदरचे प्रकरण आज पावेतो न्यायप्रविष्ट आहे. त्यातच गावात अगोदरच दोन ते तीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असुनही तसेच इतरत्र पडीत गायरान जमिन असुन सुद्धा दलित वस्तीच्या शेजारी समाज मंदिराच्या भिंतीला व वट्याला खेटुन एक नविन पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडुन मंजुर करुन त्या ठिकाणी माती परिक्षण मोजमाप करण्यात आलेले आहे. जरी ग्राम पंचायतीचा निर्णय लोकहिताचा असेल पण सामाजिक हिताचा दिसुन येत नाही. कारण बौद्ध व दलित समाजातील नागरिकांचे लग्न, सामाजिक कार्य, महापुरुषांच्या जयंती असे उपक्रम याच जागेवर राबविण्यात येतात. असे असुन सुद्धा त्याच जागेवर पाण्याची टाकी का ? असा प्रश्न उपस्थित होतो‌. त्याठिकाणी पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्यास समाज बांधवांना विविध कार्यक्रम घेण्यास जागाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे या पाण्याच्या टाकीच्या संदर्भात ग्रामपंचायतीचा ठराव रद्द करत जागा बदलुन योग्य इतर ठिकाणी टाकीचे बांधकाम करण्यात यावे अशा आषयाचे निवेदन गट विकास अधिकारी अतुल पाटील यांना देण्यात आले असुन पिण्याच्या पाण्याची टाकी इतरत्र बांधण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदकर्त्यांनी दिला आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जि. प. मुख्याधिकारी, जळगांव, जळगांव पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, उपविभागीय पोलिस अधिकारी, पाचोरा, तहसिलदा, पाचोरा, आ. किशोर पाटील, मा. आमदार दिलीप वाघ यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content