जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ दुचाकीवरुन जाणाऱ्या मजुराला अडवून त्याला मारहाण करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल लांबविऱ्या तिघांना सुप्रिम कॉलनीतील जंगलातून एमआयडीसी पोलीसांनी गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे. तिघांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश विजय जाधव (वय-२३) रा. खुपचंद साहीत्य नगर, जळगाव, सुनिल भागवत कोळी (वय-३०) आणि करण जसबीरसिंग संधु (वय-२२) दोघे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी येथे विनायक नगरात जितेंद्र भास्कर काळे (वय-३६) हा तरूण सोमवार ३ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या दुचाकीने कामावरुन घराकडे परतत असतांना, एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ या तिघांनी जितेंद्र काळे यांची दुचाकी अडवली. त्याला मारहाण करत त्यांच्याजवळील पाच हजारांचा मोबाईल, ३ हजार रुपये रोख व दुचाकीची चाबी असा एकूण ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेत तिघेही पसार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तिनही संशयित आरोपी हे सुप्रिम कॉलनीतील जंगलात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, नाना तायडे, मुकेश पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, संदीप धनगर, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, होमगार्ड विजय कोळी यांनी कारवाई करत योगेश विजय जाधव (वय-२३) रा. खुपचंद साहीत्य नगर, जळगाव, सुनिल भागवत कोळी (वय-३०) आणि करण जसबीरसिंग संधु (वय-२२) दोघे रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव या तिघांना अटक केली. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी करीत आहेत.