उत्कर्ष महोत्सवाचा तिसरा दिवस रंगतदार ठरला; उद्या होणार समारोप !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संविधान, महिला सबलीकरण, मतदान जनजागृती अशा विविध सामाजिक विषयांवर प्रभावी भाष्य करणारी पथनाट्ये, सामाजिक आशयांच्या स्वलिखित कवितांचे सादरीकरण, पारंपारिक वेषभुषेत सादर झालेली देशभक्तीपर गीते यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कर्ष महोत्सवाचा तिसरा दिवस रंगतदार ठरला. दरम्यान उद्या बुधवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष” या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पदवीप्रदान सभागृहात पथनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सामाजिक विषयांवर विविध विद्यापीठांच्या कलावंतांनी पथनाट्ये सादर केली. महिला सबलीकरण, देशाचे भवितव्य्, देशाचा दृष्टिकोन, पारलिंगी समाजाच्या व्यथा, संविधान व मतदान जागृती, व्य्सनमुक्ती, कायदे-ए-लष्क्र अशा विविध विषयांवर कधी उपहासात्मक तर कधी थेटपणे टिपण्णी करत उपस्थितांना अंतर्मुख केले. आवाजातील चढ-उतार, अभिनय यासोबतच सांघिकतेचे उत्तम भान याचा प्रत्यय वेळावेळी येत होता. एकूण १४ विद्यापीठांनी पथनाट्यात भाग घेतला.

पथनाट्य सादरीकरणानंतर स्वलिखित काव्य् वाचन स्पर्धा झाली. हिंदी व मराठी मध्ये ३२ विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. त्यामध्ये धर्म आणि जातीमध्ये वाढीला लागलेला द्वेष, प्राकृतिक विनाश, शेतकऱ्यांची झालेली अवस्था, पारलिंगी व्य्‍क्तींची कोंडी, वेश्या व्यवसायातील स्त्रीचे मनोगत अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यामध्ये सादरीकरणावर अधिक भर दिसून आला.

दुपारच्या सत्रात समुहगीत सादरीकरण करण्यात आले. देशभक्ती आणि लोकगीत अशा दोन प्रकारांवर समुहगीत आधारीत होते. आवाजातील खणखणीतपणा, गीताच्या विषयानुसार वेशभुषा यामुळे श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. देशभक्तीपर गीतांनी सभागृहातील वातावरण बदलून गेले. सायंकाळच्या सत्रात भित्त्तीचित्र घोषवाक्य्‍ आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेसाठी शिक्षणाचे खाजगीकरण : संधी की संकट, अमृत महोत्स्व स्वातंत्र्याचा : काय कमविले काय गमविले, माणसं ऑनलाईन आणि माणूसकी ऑफ लाईन, आरक्षण : आर्थिक की सामाजिक, स्त्रीचे जगणे : माणूसकीची आस हे पाच विषय देण्यात आले होते. सकाळच्या सत्रात कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी भेट दिली.

बुधवार २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता सिनेट सभागृहात अभिनेते तथा मुंबई विद्यापीठाच्या अकादमी ऑफ थिएटर ॲण्ड आर्टसचे संचालक प्रा.योगेश सोमण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, उत्कर्षचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती असेल. अशी माहिती कुलसचिव डॉ.विनोद पाटील, रासेयोचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी दिली.

Protected Content