दोन भावांचे भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथे शेताच्या बांधावरून दोन भावांचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या मोठा भावाला एका भावाने व त्याच्या पत्नीने लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी दुपारी अडीच वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भोरस गावातील रहिवाशी असलेले राजेंद्र त्र्यंबक पाटील हे चाळीसगाव शहरात वास्तव्याला आहे. त्यांचे दोन भाऊ विजय त्र्यंबक पाटील आणि दिलीप त्र्यंबक पाटील हे भोरस गावात शेती करतात. गेल्या काही दिवसांपासून दिलीप आणि विजय या दोन भावांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता. त्यामुळे दिलीप पाटील यांनी मोठा भाऊ राजेंद्र पाटील यांना फोनवरून भाऊ विजय पाटील हा माझ्याशी भांडण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठा भाऊ या नात्याने राजेंद्र पाटील हे दोन्ही भावांचा वाद मिटविण्यासाठी शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता दोन्ही भावांच्या शेतात गेले. त्यावेळी त्यांचे भाऊ विजय आणि दिलीप यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी राजेंद्र पाटील यांनी मध्यस्थी करून भांडण करू नका असे सांगितले. याचा राग आल्याने विजय त्र्यंबक पाटील आणि त्याची पत्नी शारदा विजय पाटील यांनी शिवीगाळ करत राजेद्र त्र्यंबक पाटील यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. त्यावेळी मोठ्या भावाला मारहाण करत असल्याचे पाहून लहान भाऊ दिलीप पाटील व पुतण्या हर्षल दिलीप पाटील यांनी भांडण सोडविले. त्यामध्ये हर्षल देखील विजय पाटील याने मारहाण केल्याने तो देखील जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी राजेंद्र पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी १८ मे रोजी दुपारी अडीच वाजता भाऊ विजय त्र्यंबक पाटील व त्यांची पत्नी शारदा विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे हे करीत आहे.

Protected Content