फैजपूरमधील ‘तो’ घाणेरडा प्रकार करणारे तिघे अल्पवयीन ! : अखेर गुन्हा दाखल

फैजपूर, ता. यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जलशुध्दीकरण केंद्रात पोहण्याचा घाणेरडापणा करणारे तिन्ही जण हे अल्पवयीन असल्याचे आढळून आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, “फैजपूर शहरासाठी शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी खिरोदा रोडवर फैजपूर नगरपालिकेचे जलशुध्दीकरण केंद्र आहे. याठिकाणी काही मुलं स्विमींग पुल समजून येथील पाण्यात पोहत असल्याची घटना नुकतीच घडली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. संपूर्ण शहर जे पाणी शुध्द म्हणून पितो, यात हे तिन्ही जण बिनधास्तपणे पोहत असल्याचे समोर आल्याने शहरातून अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

दरम्यान, आज संदर्भात महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्यासह शहरातील मान्यवरांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी मुख्याधिकार्‍यांनी माहिती दिली की, ‘हा प्रकार २ सप्टेंबर रोजीचा असून आपण त्याच दिवशी संबंधितांवर कारवाई करावी.’ असे पत्र पोलिसांना दिले आहे. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

यानंतर फैजपूर पोलीस स्थानकात पाणी पुरवठा कर्मचारी किशोर तापीराम भारंबे यांनी फिर्याद दिली. यानुसार, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा घृणास्पद प्रकार करणारे तिन्ही तरूण हे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.” या अनुषंगाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content