जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जळके शिवारात शेतातील शेततळ्यातील चक्क ११०० चौरस मीटर एवढा ६५ हजार रुपये किंमतीचा प्लास्टिक पेपर चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके गावातील रहिवासी प्रशांत अशोक पाटील वय ४० यांची जळके शिवारात शेती आहे. या शेतीत त्यांनी शेततळे उभारले असून त्यात ५० मायक्रॉन जाडीचा , ११०० रुपये चौरस मीटर लांबीचा पेपर शेततळ्यात टाकलेला होता. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकरी प्रशांत पाटील हे शेतात आले असता, त्यांना शेततळ्यातील प्लास्टिकचा पेपर दिसून आला नाही. सर्वत्र परिसरात शोध घेवूनही प्लास्टिकचा पेपर मिळून आला नाही. अखेर चोरीची खात्री झाल्यावर प्रशांत पाटील यांनी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत.