चॉपरने वृध्दाचा खून करून फरार झालेल्या संशयिताला अटक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत ८ मे रोजी सकाळी सुपडु नाना वेलसे (वय ६५, रा. पेठ भाग, भडगाव) या वृद्धास काहीतरी घातक शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना उघड झाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ५ तासात मारेकरी तरूणाला अटक केली आहे. उसनवारी पैसे सारखे मागत असल्याने वृद्धाचा चॉपरने खून केल्याचे कबूल केले आहे. पुढील कारवाईसाठी संशयिताला भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (वय २१, रा. पेठ भाग भडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, सुपडु नाना वेलसे (वय ६५, रा. पेठ भाग, भडगाव) हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मृतदेह भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाचे मधिल दगडाचे खदानीत ८ मे रोजी सकाळी मिळून आला होता. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांचे पथक पोउपनिरी गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव अश्यांना घेवून घटनास्थळी वरखेड ता. भडगाव जवळील खदान येथे जावून त्यांनी मयताची ओळख पटविली. याप्रकरणी एलसीबीने तपास सुरु केला होता. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मयत सुपडु वेलसे हा संशयित आरोपी कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे (वय २१, रा. पेठ भाग भडगाव) याचे सोबत होता. त्यावरून वरील पथकाने कुणाल मराठे याचा पेठ भागात भडगाव येथे शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.

संशयित आरोपी कुणाल मराठे याने गुन्हा कबूल केला. सुपडु वेलसे याचे कडून उसनवारीवर कुणाल मराठे याने पैसे घेतले होते. काही पैसे कुणाल मराठे याने वेलसे याला परत केले. परंतु तो वारंवार कुणालकडे पैसे मागुन तगादा लावीत होता. तसेच वारंवार कुणाल मराठे याचे घरी येवून त्याला व घरचे लोकांना गल्लीत मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करीत होता. त्यामुळे कुणालच्या घरची मंडळी, आई व वडील हे घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे कुणालला सुपडू वेलसे याच्यावर राग होता. सुपडु वेलसे यास दि. ०७ मे रोजी “तुझे उधारीचे पैसे दयायचे आहे” असे सांगुन कुणालने एरंडोल रस्त्याला बोलावून ‘पिंपरखेडला एकजण पैसे देणार आहे, त्याचे कडून घेवून तुला देतो’ असे सांगुन वेलसे यास मोटार सायकलवर बसवून घेऊन गेला.

सुपडू वेलसे यांना वरखेड गावाचे पुढे पिंपरखेड गावाचे दिशेने कुणाल मराठे याने घेवून जावून उजव्या बाजुस असलेल्या दगडाच्या खदानीत नेत चॉपरने जीवे ठार मारले. त्यावरून एलसीबीने त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

Protected Content