दागिने पॉलिश करणे पडले महागात; दोन महिलांना बसला चांगलाच फटका

धरणगाव-लाईवह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबे, पितळाचे भांड्यांसह सोन्याचे व चांदीचे दागिने चमकवून देतो असे सांगून अज्ञात दोन भामट्यांनी दोन महिलांची फसवणूक करून ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव शहरातील मातोश्री नगरात घडली. या प्रकरणी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलिसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील मातोश्री नगरात स्वाती रामदास रोकडे वय-२६ आणि इंदुबाई हरी सोनवणे या महिला वास्तव्याला आहे. दरम्यान मंगळवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीवर अज्ञात दोन मातोश्री नगरात आले. त्यावेळी स्वाती रोकडे आणि इंदुबाई सोनवणे या दोघांना तुमची तांबे, पितळाचे भांड्यांसह सोन्याचे व चांदीचे दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन्ही महिलांना घरातील सोन्याचे दागिने, सोन्याचे कर्णफुले आणि सोन्याची मंगलपोत चमकविण्यासाठी दिले. या दोन भामट्यांनी महिलांना चकवा देत ५६ हजार रूपये किंमतीचे दागिने घेवून फसवणूक करत पसार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर स्वाती रोकडे यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ३ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content