‘त्या’ फरार कैद्याच्या मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे येथून भुसावळात नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

राजू विक्रम खांडेलकर (वय-२०) रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशीकी, राजू खांडेकर यांच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्याला धुळे जिल्हा कारागृहात दाखल केले होत. दरम्यान या गुन्ह्यात राजू विक्रम खांडेकर याला ट्रान्सफर वॉरंट घेवून भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रशिद तडवी, पोलीस नाईक जाकीर मंसूरी व पोलीस नाईक विकास बाविस्कर यांनी बुधवार ३० मार्च रोजी ताब्यात घेवून भुसावळकडे रवाना झाले होते. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील जैन इरीगेशन कंपनी आल्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका मारत आरोपीने चालत्या वाहनातून उडी टाकून पळ काढला होता. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस कर्मचारी देखील भांबावले व त्यांनी काही अंतरापर्यंत आरोपीचा पाठलाग केला परंतू अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आरोपी हा रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार वसंत लिंगायत, पोहेकॉ दिपक पाटील, पोना किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील अश्या पथकाला अटक करण्याकामी रवाना केले. आरोपी राजू विक्रम खांडेलकर (वय-२०) रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर याला तांदलवाडी येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content